कबड्डीचा महाराजा

त्याकाळात कबड्डी खेळाडूंना आतासारखे कोणतेही पुरस्कार अथवा मोठ्या रकमेची बक्षिसे दिली जात नसत. अशा काळात राजाराम पवार यांचा खेळ बहरला. अस्ताला चाललेल्या हुतुतुच्या साम्राज्यातुन एका गुणी अष्टपैलू खेळाडूने कबड्डीच्या साम्राज्यात प्रवेश केला. पुरस्कारापासुन वंचित राहिलेल्या या खेळाडूला कबड्डी-रसिकांनी मात्र आपल्या ह्रद्यसिंहासनावर विराजमान केले होते. शांत, धीरगंभीर, निस्वार्थी, नि:स्पृह, सत्यप्रिय, दिलदार स्वभाव असलेल्या या व्यक्तिमत्वापुढे तमाम क्रिडा रसिक नतमस्तक झाले नाही तरच नवल! १९५० नंतरचा तो काळ दर्जेदार कबड्डी खेळाडूंचा काळ होता. प्रत्येक खेळाडूंचे गुण-वैशिष्ट्य वेगवेगळे! तरीदेखील राजाराम पवार यांच्या खेळाने कबड्डी रसिकांना मोहून टाकले होते. अमर भारत संघाचा सामना ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी क्रिडा-रसिक तुफान गर्दी करीत. त्याकाळी सामने पहाण्यासाठी तिकीट आकारले जाई. आज मोफत सामने पहाण्याकरिता जेवढी गर्दी होत नाही त्याच्या कितीतरी पटीने लोकं तिकीट खरेदी करुन गर्दी करीत. संघ येण्यास उशीर झाला तरी ते त्या संघाची तिष्ठत वाट पहात. कारण त्याकाळी ठराविक संघच पहिल्या चार क्रंमाकात खेळत असल्यामुळे एकाच दिवशी चारपेक्षा अधिक सामने देखील खेळावे लागत आणि खेळाडू ते न कुरकुरता खेळत देखील.

राजाराम पवार यांचा जन्म २४ ऑगष्ट १९२४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सडवली गावी झाला. बालपणातील काही काळ प्रभादेवी येथील वाकडीचाळ येथे वास्तव्य होते. वडिल खटाव मिल मध्ये कामाला म्हणुन त्यापुढील सर्व आयुष्य भायखळा येथे गेले. मुंबईच्या तेंडुलकर इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ४थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नियतीने त्यांना शिक्षणाचा लाभ होऊ दिला नाही; पण उत्तम शरीरसंपदा मात्र दिली. नियमित व्यायामाने त्यांनी त्यास बांधेसूदपणा आणला. परमेश्वराने आणखी एक गोष्ट त्यांना बहाल केली क्रिडा-कौशल्याचे भांडार त्यांच्यापुढे रिते केले. राजाभाऊंनी ते क्रिडारसिकांसाठी मुक्तपणे उधळले. त्यात कोणताही कंजुषपणा केला नाही. वयाच्या १४व्या वर्षापासुन त्यांनी कबड्डी खेळावयास सुरुवात केली. सरावासाठी मैदान उपलब्ध नसताना, अर्धारस्ता व अर्धे मैदान अशा जागेचा ते सरावासाठी उपयोग करीत. त्यावेळी हुतुतु-कबड्डी हा वाद सुरु होता. डॉ. कुलकर्णी यांना मध्यस्थी घालुन त्यांनी दोन्ही ठिकाणी खेळावयाची परवानगी मिळविली. त्यांचा व्यावसायिक संघ शासकीय मुद्र्णालय होता.

राजाराम पवार यांची १९५० साली प्रथम मुंबई संघात निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १५ वर्ष त्यांनी मुंबईचे प्रतिनिधीत्व केले. त्यातील १० वर्ष ते संघनायक होते. महाराष्ट्राचेही त्यांनी ४ वर्ष कप्तानपद भूषविले. महाराष्ट्र व मुंबईच्या नेतृत्वाचा राजदंड त्यांच्या इतका अधिक काळ कोणीच सांभाळला नसेल. त्यांच्या काळात त्यांनी कबड्डीची प्रतिष्ठा सांभाळली. कोणत्याही स्पर्धेत पहिल्या फेरीपासुन ते खेळत. सुरुवात झाली म्हणुन सामना खेळण्यास त्यांनी कधीच कुचराई केली नाही. दुखापतीमुळे खेळावर परिणाम व्हायचा, परंतु सहकार्‍यांच्या साथीने ते त्या सामन्यात निभावून नेत. त्यांच्या खेळातील रुबाब एखाद्या राजाला लाजवील असा होता. परंतु त्यांचा स्वभाव अगदी नम्र होता. चांगल्या खेळाची व खेळाडूंची ते कदर करीत. त्यांच्या अशा स्वभावामुळेच त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला होता. कोठेही सामना असो त्यांचे पाठीराखे कामावरुन सुटल्यावर थेट सामना पहाण्यासाठी जात. दुपारच्या जेवणाचा रिकामा डबाही त्यांच्या सोबत असे. सर्व सामने पाहुनच रात्री ते उशीरा घरी जात. एवढी नशा त्यांच्या खेळाची होती. त्यांच्या नेतृत्वात कोल्ह्याची धुर्तता होती. त्यामुळेच त्यांनी मुंबईचे १० वर्ष व महाराष्ट्राचे ४ वर्ष कर्णधारपद भूषविले. नियमाबद्दल त्यांनी कधीच वाद घातला नाही. खोटे कधी बोलले नाही. पंचाचा निर्णय शिरसावंद्य मानून ते खेळले. कारण त्यांच्या अंगात एकहाती सामना फिरवण्याची धमक होती. त्यांनी विरुध्द संघाच्या खेळाडूस कधीही कमी लेखले नाही. त्यांचा योग्य तो आदर ते राखीत. सामन्यात कितीही चुरस झाली तरी सामना संपल्यावर प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंना प्रेमाने आलिंगन दिल्याशिवाय ते क्रिडांगण सोडत नसत.

राजाभाऊंचा कबड्डी कौशल्याचा भाताही अक्षय होता. त्यांच्या चढाईत आक्रमकता होती. त्यात साचेबंदपणा नव्हता. एका जागी ते कधीच स्थिर उभे रहात नसत. कधी हवेत लाथ मारुन तर कधी साधी लाथ मारुन ते गडी टिपत. कधी हाताने गडी टिपत मध्येच बैठीलाथ सरकवुन एखादा हुकमी गुण वसुल करीत. त्यांचे क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचे होते. उजवा कोपरारक्षक म्हणुन ते क्षेत्ररक्षणाच्या जागी उभे रहात. चवडा व पट काढणे हे त्यांचे हुकमी अस्त्र. त्यांचासारखा ब्लॉक कोणताच खेळाडू करीत नसे. चढाई करणारा अंगावर येण्याची वाट न पहाता ते बेधडक चढाई करणार्‍या खेळाडूच्या अंगावर चाल करुन जात व त्याची पकड करीत. नेतृत्व गुण तर त्यांच्या नसा-नसात भिनलेले होते. या त्यांच्या कल्पक नेतृत्वाला स्वकर्तृत्वाची साथ होती.

कबड्डीच्या वैभवशाली व रोमहर्षक इतिहासात काळाकुट्ट दिवसही त्यांच्या आयुष्यात उगवला. विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र विरुध्द रेल्वे हा अंतिम सामना ०-० गुणसंख्येवर संपला. गुणसंख्येचा एवढा प्रचंड दुष्काळ कबड्डी इतिहासात यापूर्वी कधीच पडला नव्हता. त्या सामन्याचा निकाल नाणेफेकीवर लावण्यात आला. त्यात राजाराम पवार यांनी नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिले. परंतु गुणांची बरसात करणार्‍या राजाभाऊंना या काळ्याकुट्ट इतिहासाचे साक्षीदार व्हावे लागले. जबलपूरच्या राष्ट्रीय स्पर्धेत राजाभाऊने आणखी एक अपयशाचा घोट पचविला. जबलपूरच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम सामन्यांत रेल्वेवर आघाडी घेतली होती. परंतु ऐनवेळी दत्ता मालप यांचा संयम सुटला. त्यांनी सदानंद शेट्टे यांना पकडण्याची घाई केली. त्या चढाईत महाराष्ट्राचे ५ खेळाडू सदा शेट्टे यांनी टिपले. त्यामुळे महाराष्ट्रावर झटपट लोण झाला. त्या धक्क्यातून महाराष्ट्राला सावरता आले नाही. या अपयशामुळे राजाभाऊंच्या कारकिर्दीतील हॅट्रीक हुकली; परंतु या पराभवाचे खापर त्यांनी कोणाच्या माथी मारले नाही. त्यांच्यातला हा खिलाडूपणा त्यांच्या अन्य सहकार्‍यांनाही भावत असे.

१९६५ साली कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी या पराभवाचा वचपा काढला. १५ वर्ष सलग व सतत खेळून ते थकले होते. परंतु त्यांच्या खेळातील कौशल्याची धार बोथट झाली नव्हती. या राष्ट्रीय स्पर्धेत ते तडफेने खेळले. ऐन उमेदीतल्या काळातील त्यांचा खेळ पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहावयास मिळाला. या सामन्यांत राजाभाऊंनी कबड्डी रसिकांना खेळाची मेजवानीच दिली. अंतिम सामना महाराष्ट्राचा पारंपारिक प्रतिस्पर्धी रेल्वेबरोबरच होता. रेल्वेच्या संभा भालेला निदान रेषेवर गारद करीत त्यांनी रेल्वेला धोक्याचा इशारा दिला. त्यानंतर भराभर गुण घेत त्यांनी महाराष्ट्राची आघाडी वाढवित नेली. रेल्वेचे खेळाडू देखील चाणाक्ष व चतुर होते. त्यांनी महाराष्ट्राचे कच्चे दुवे हेरत त्यालाच खिंडार पाडले व बाजी परतविली. सामन्याची शेवटची चढाई शिल्लक असताना रेल्वेकडे २ गुणांची आघाडी होती. त्याने विचलित न होता सामन्याची शेवटची चढाई राजाभाऊंनी टाकली. मदन पुजारी सारख्या संयमी खेळाडूला तापविले. त्यांनी राजाभाऊंना पकडण्याची चूक केली. त्या चढाईत राजाभाऊंनी रेल्वेचे ४ गडी टिपले व महाराष्ट्राला २ गुणांनी विजय मिळवुन दिला. सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. क्षणभर काय घडले ते रेल्वेच्या खेळाडूंना कळलेच नाही. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट राजाभाऊंनी शक्य करुन दाखविली होती. त्याच क्षणी त्यांनी आपली निवृत्ती जाहिर केली. कबड्डीच्या प्रेमापोटी ते अमर भारत व शासकीय मुद्रणालय या संघाकडून काही काळ खेळले.

परशुराम पाटील या गुणी व होतकरु खेळाडूला महाराष्ट्राकडून संधी मिळत नाही म्हणुन संघनायक असताना देखील ते बाहेर बसले. परशुराम पाटील या खेळाडूने त्या संधीचे सोने केले. एवढा मनाचा मोठेपणा फक्त राजाभाऊच दाखवू शकतात. जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता ते महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक होते. माणिक भोगाडे त्या संघाचे संघनायक होते. अंतिम सामन्यात शांताराम जाधवच्या हाताला जबर मार लागल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर वेदना स्पष्ट जाणवत होत्या. परंतु त्याला बाहेर कोण बसविणार? शांताराम जाधव तर महाराष्ट्राचा हुकमी खेळाडू. परंतु राजाभाऊंच्या लक्षात हि गोष्ट आल्यावर त्यांनी शांतारामला बाहेर बसविले व तो सामना नंतर महाराष्ट्राने जिंकला. शांतारामला बाहेर बसवून दुसर्‍या खेळाडूला संधी देणे म्हणजे धोका पत्करण्यासारखेच होते. परंतु राजाभाऊंसारखीच व्यक्ति हा धोका पत्करुन निर्णय घेऊ शकते. या विजयाचा आनंदोत्सव सांगली येथे साजरा करण्यात आला. परंतु त्याचे साधे निमंत्रणही त्यांना देण्यात आले नव्हते. ते का दिले गेले नाही याचं शल्य त्यांना अजुनही बोचत आहे.

खेळातून निवृत्त झाले तरी खेळाच्या मैदानापासून मात्र ते दूर झाले नाहीत. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी ते मुंबई शहर कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणुन कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांची काम करण्याची तडफ व निर्णय क्षमता अफाट आहे. नवोदिताला प्रोत्साहन देणे हा त्यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण! गुणी व होतकरु खेळाडू कार्यकर्ते यांना ते नेहमीच प्रोत्साहित करीत आले आहेत व आजही करीत आहेत. एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने मुंबई शहरच्या कार्यात ते सहभागी होतात. १९७० पासून त्यांनी मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ व मुंबई जिल्ह्यात सदस्य म्हणून काम पहावयास सुरुवात केली. मुंबई संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम पाहिले. त्यात ते यशस्वी देखील झाले. आजही त्यांचा कल तरुण व होतकरु व्यक्तिंना प्रोत्साहन देण्याकडेच जास्त असतो.

कबड्डीच्या दुनियेतील हा ‘राजा’ राजासारखा खेळला; राजासारखा वागला, इतरांनाही वागवलं, खेळायचे कसे याचं आदर्श उदाहरण देऊन या ‘राजाने’ आपले सिंहासन इतरांसाठी खाली केले….. पण महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कोणत्याच कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिला नाही याची खंत त्यांच्या मनात कायमची लागून गेली आहे. कित्येक खेळाडूंना विशेष पुरस्कार जाहिर झाले. कार्यकर्त्यांनाही पुरस्कार जाहिर झाले. एवढी वर्ष ते महाराष्ट्रासाठी खेळले; मुंबईसारख्या कार्यरत जिल्ह्याचा कारभार कित्येक वर्ष ते पहात आहेत. त्याचे मोल काहीच नाही? ते खेळत असताना पुरस्कार पध्दत नसल्यामुळे तो मिळाला नाही; तर पुढे-पुढे करण्याची सवय नसल्यामुळे कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळाला नाही. शेवटी हा ‘राजा’ उपेक्षितच राहिला व शापितासारखाच जगत आहे.