कबड्डीचा आत्मा ........"दम"

- शशिकांत राऊत

कबड्डी …. हा मराठमोळ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ! जनमान्यतेबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कबड्डी खेळाने देशाचीच नव्हे, तर आशिया खंडाची वेश ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. हा खेळ एकाच सूरात (दमात) व एकाच नियमाने सर्वत्र खेळला जावा याकरिता भारतीय हौशी संघटनेची स्थापना होऊन आज जवळ जवळ सहा तपे होत आली. हे सर्व करण्यात व कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्यास महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीच नाकारु शकणार नाही. या ६ दशकाच्या काळात महाराष्ट्राने कितीतरी स्थित्यंतरे पाहिली. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने जवळ जवळ ३ दशके अनभिषिक्त सम्राट म्हणुन अधिसत्ता गाजविली. परंतु त्यानंतर जवळपास तेवढाच काळ पराभवाची कडवट चवही चाखली. हा खेळ जस-जसा लोकप्रिय होत गेला; तसतसे यात बदल होत गेले. परंतु कबड्डी हा खेळ आपण का खेळावा? याचा शास्त्रीय पाया काय? या खेळामुळे आपणास आपल्या जीवनात काय फायदा होऊ शकतो याचा विचार फार कमी लोकांनी केला असेल.

कबड्डी या खेळाची शास्त्रीय बैठक हि ‘योगा’वर आधारीत आहे. या खेळामुळे आपणांस चार गोष्टींचा फायदा होऊ शकतो. १) शरीर निरोगी व आरोग्यदायी रहाते. २) निर्णय क्षमता वाढते. झटपट निर्णय घेऊन त्याच्या परिणामाला सामोरी जावयाचे धैर्य येते. ३) कोणत्याही क्षेत्रात सहकार्‍यांशी मिळून मिसळून कार्य करण्याची प्रवृत्ती वाढते. ४) जीवनात सुखाच्या आनंदाबरोबरच दु:खाचा कटू घोट खिलाडूवृत्तीने स्विकारावयाचे सामर्थ्य अंगी येते.

कबड्डी या खेळात ‘दमाला’ फार महत्त्व आहे. कबड्डी महर्षी बुवा साळवी नेहमी म्हणत ‘दम’ हा कबड्डीचा आत्मा आहे. हा आत्माच आज हरविला आहे. परंतु या ‘दमा’चे महत्त्व काय याचे आकलन आज आपणांस होत आहे. अमेरिकेने एखाद्या गोष्टीचे महत्त्व विशद केले की आपण त्यांची टिमकी वाजवित त्यांचा उदोउदो करावयाचा. त्यांच्या ‘रि’ त ‘रि’ ओढावयाची. परंतु आपल्या देशातील व्यक्तींनी सांगितली की त्याची टिंगल करावयाची हि आपल्या लोकांची वृत्ती! म्हणतात ना ‘घर की मुर्गी डाल बराबर’ हे या ठिकाणी नमुद करावयाचे कारण म्हणजे योग साधना! अमेरिकेने योगाचे महत्त्व सांगितल्याबरोबर आपल्याकडे लोकांचा कल योग साधनेकडे वाढत चालला. पूर्वी साधू-संत या योगामुळेच चिरतरुण व निरोगी रहात याचे अप्रुप कुणालाच नाही. त्याचा कोणी शोध घेतला नाही. परंतु विदेशी लोक म्हणतात ना म्हणजे ते चांगले! असो.

‘कबड्डी’ या खेळात देखील योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ‘दम’ धरतो म्हणजे काय करतो? आपण कबड्डी-कबड्डी असा जेव्हा दम घेतो, त्यावेळी संपुर्ण श्वास कोंडला जातो. श्वास कोंडून धरणे हा योगामधील प्राणायामचा प्रकार आहे. काही वर्षापूर्वी अमेरिकेने या प्राणायामवर बंदी आणली होती. बंदी का? तर शरीराला प्राणवायुचा पुरवठा कमी होतो. परंतु आज याचे महत्त्व ओळ्खुन त्यांनी ती बंदी उठविली आहे. प्राणायाम म्हणजे काय तर जास्तीत-जास्त आपणांस जमेल तेवढा वेळ श्वास कोंढून ठेवणे. यामुळे शरीराची रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. कबड्डी या खेळात याच योगाचा उपयोग केला आहे. ज्यावेळी आपण एकाच सुरात कबड्डी-कबड्डी हा दम न चोरता घेतो त्यावेळी आपला श्वास कोंडलेला असतो परंतु या खेळात आपण दम कोंडून ठेवण्याबरोबर आणखी एक गोष्ट करीत असतो ती म्हणजे आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची जलदगतीने हालचाल. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण जलद गतीने होत असते. या क्रियेमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

कबड्डी या खेळात व्यवस्थित दम धरल्यामुळे हा खेळ खेळ्ताना जोश व जोर आपणांस मिळतो. ज्युडो-कराटे या खेळात देखील पहा एका फटक्यात वीट, बर्फाची लादी अगर लाकडाची फळी फोडावयाची असेल तर एक दिर्घ श्वास घेतात. तो कोंडून एक मोठ्याने हुंकार देत त्या वस्तुवर आघात करतात. त्यामुळे ती वस्तु तुटते. म्हणजेच श्वास कोंडून एखादे कार्य केले की तुम्ही एकाग्र होता. त्यामुळे तुम्हाला अधिक शक्ती मिळते व तुमचे इच्छित कार्य सिध्द होते. जलतरणात देखील जेव्हा पाण्याच्या खालुन सुर मारला जातो तेव्हा देखील तो प्राणायामचाच प्रकार आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळाचे शिबीर लोणावळा येथे घेण्यात आले त्यावेळी आम्हांला हे समजले. लोणावळा येथील योग ध्यान साधना संस्थेचे असिस्टंट डायरेक्टर यांना या शिबीरात निमंत्रित केले होते तेव्हा त्यांनी कबड्डी या दमाचे महत्त्व विशद केले. पूर्वीचे कबड्डी खेळाडू एवढ्या मोठ्याने हा सूर धरत की प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या क्रिडा रसिकांना देखिल तो स्पष्ट ऐकू येत असे. त्याचा फायदा त्यांना या वयात देखिल होत आहे. राजाराम पवार, सदानंद शेट्टे, शेखर शेट्टी, शांताराम जाधव, तारक राऊळ अशा किती तरी खेळाडूंची नावे उदाहरणादाखल सांगता येतील.

एवढा सगळा खटाटोप करण्यामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे आताच्या खेळाडूंनी दम नीट व स्पष्टपणे धरावा. कबड्डीचा आत्मा जो ‘दम’ मृतवत झाला आहे त्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळावी. आपले आरोग्यदेखील सुधारावे. दुखापतीचे प्रमाण कमी व्हावे. श्वास कोंडून दम धरल्यामुळे आपल्या अंगात अधिक ऊर्जा उत्पन्न होते. त्यामुळे चढाई करणारा एकटा खेळाडू आपल्याविरुध्द असलेल्या अनेकांशी त्वेषाने लढत देत असतो. पाहूया किती जण या गोष्टीचे अनुकरण करतात. या गोष्टीचा विचार करुन जेव्हा कबड्डी या ‘दमाला’ पुर्नजीवन प्राप्त होईल; तेव्हा ती ‘बुवांना’ देखील भावांजली ठरेल.

कबड्डी या खेळाचा दूसरा फायदा म्हणजे आपली निर्णय क्षमता वाढते. आपण ज्यावेळी हा खेळ खेळतो त्यावेळी चढाई करणार्‍या अगर बचाव करणार्‍या दोन्ही खेळाडूंनी काही क्षणांच्या फरकात निर्णय घ्यावयाचे असतात. आपण चटकन निर्णय घेऊ शकलो नाही तर आपला प्रतिस्पर्धी आपल्यावर मात करण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला आपले निर्णय आपणच घ्यावयाची सवय लागते. त्याच बरोबर घेतलेला निर्णय बरोबर असो अगर चूक त्याला सामोरी जावयाचे धैर्य अंगी येते. याचा फायदा असा होतो की जीवनातील चढ-उताराला आपण धैर्याने तोंड देतो व कोणताही निर्णय पूर्ण विचाराने घेण्याची सवय अंगी बाणवते.

कबड्डी हा खेळ सांघिक असल्यामुळे संघ भावनेला यात फार महत्त्व आहे. सर्वांनी एका विचाराने हा खेळ जिंकण्यासाठी खेळावयाचा असतो. यात एकाने जरी चूक केली तरी पदरी अपयश येण्याची शक्यता जास्त असते. एकटा खेळाडू कितीही चांगला खेळला तरी त्याला इतरांचे सहकार्य मिळाले नाही तर विजय मिळविणे जड जाते. यामुळे आपण आपले यशापयश इतरांबरोबर वाटून घ्यावयास शिकतो. जीवनांत याचा आपणास फार उपयोग होतो. नोकरी व्यवसायात जर आपण या स्वभावामुळे चांगल्या प्रकारे प्रगती करु शकतो. हा खेळ खेळणारे कित्येक खेळाडू राजकारणात व आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत.

कबड्डी या खेळात हार-जीत हि खिलाडूवृत्तीने स्विकारली जाते. हि सर्वच खेळातील घटना आहे. परंतु ज्यावेळी सामना संपतो त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटून आलिंगन देतात. मग तो निर्णय काहीही लागो. यामुळे यशाने उन्मत्त व्हायचे नाही तर अपयशाने खचून जावयाचे नाही. कोणताही निर्णय खिलाडूवृत्तीने स्विकारायचा व अपयशाने खचून न जाता पुन्हा जीवनात जोमाने उभे रहावयाचे. यावरुन मला पालकांना एकच सुचवायचे आहे की आपला पाल्य मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्याला कोणताही मैदानी खेळ खेळायला पाठवा. त्यात त्याला करीयर करता आले नाही तरी जीवनातील चढ-उतार त्याला निश्चित कळतील. त्याचे आरोग्य निरोगी व तंदुरस्त बनेल यात शंकाच नाही.