'वाटचाल मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची'
‘कबड्डी’ म्हटले की मुंबईचे अस्तित्व कोणीही नाकारु शकत नाही. मुंबईतुन या खेळाचा प्रचार व प्रसार झाला. सुरुवातीला निव्वळ हौस व मनोरंजनासाठी खेळला जाणारा हा खेळ, परंतु आज मात्र यात व्यावसायिकता आली आहे. १९३५ साली मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी या शारीरिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली वेगवेगळ्या खेळाच्या समित्या अस्तित्वात आल्या. त्या समित्या आपापल्या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात हुतुतु, आट्यापाट्या, खो-खो, लंगडी, लेझिम, कुस्ती, मल्लखांब आदी अनेक खेळाचा समावेश होता. १९५६ साली मुंबई जिल्हा हुतुतु फेडरेशन व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ यांचे एकीकरण झाले. महाराष्ट्रात कबड्डी हा खेळ हुतुतु या नावाने खेळला जात असे.
१९५६-५७ साली मुंबई जिल्हा हुतुतु फेडरेशनची रितसर निवडणुक होऊन या संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा कै. श्री. सो. श. प्रभु यांच्यावर सोपविण्यात आली, तर सह-कार्यवाह म्हणुन श्री. बी. बी. माने व आबासाहेब नाईक यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर १९५९-६० साली झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत हि जबाबदारी कै. श्री. किसनराव सपकाळ यांच्याकडे आली; तर सह-कार्यवाह म्हणुन कै. श्री. विठ्ठल वाणी व कै. श्री. रामभाऊ कांदळगांवकर यांची निवड झाली. त्यावेळी कबड्डी व हुतुतु अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा होत होत्या. खेळाडूना दोन्ही प्रकारात खेळता येत होते. अशा प्रकारे १९६४ पर्यंत मुंबईत हुतुतुच्या स्पर्धा होत होत्या. त्यानंतर मात्र कबड्डी या नावानेच हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जाऊ लागला.
यावेळी मुंबईत कबड्डीची हवा देखील जोरात होती. कबड्डी-हुतुतु हा वाद १९५० पासून सुरु झाला. मुंबई जिल्हा हुतुतु फेडरेशन असुन देखील मुंबईचा संघ कबड्डी स्पर्धेत सहभागी होत होता. त्यावेळी मुंबई संघाच्या प्रतिनिधीक संघात राजाराम पवार, वसंत ढवण, बाबाजी जामसांडेकर, मधु पाटील, वसंत सूद आदी कित्येक नामांकित खेळाडू होते. १९५९ ते १९६४ या कालावधीत मुंबईचे सलग संघनायक पद भूषविणार्या राजाराम पवार यांनी मुंबईला सलग विजेतेपद तर मिळवून दिलेच; परंतु महाराष्ट्राला देखील आपल्या नेतृत्वाखाली हॅटट्रिक साधून दिली. राजाराम पवार, वसंत ढवण, बाबाजी जामसांडेकर, मधु पाटील, वसंत सूद, शेखर शेट्टी यांनी आपल्या खेळाचा ठसा राष्ट्रीय स्पर्धेत देखील उमटविला.
१९५० साला पासून कबड्डी-हुतुतु हा वाद अखेर १९६४ साली संपुष्टात आला. अखिल भारतीय स्तरावर या खेळात एकसुत्रीपणा यावा व देशातील सर्व राज्य या देशी खेळाच्या प्रगतीच्या दृष्टीने एक छत्राखाली येऊन अखिल भारतीय स्तरावर खेळाचे आयोजन होणे आवश्यक आहे हे ओळखुन अनेक दिग्गज मंडळीच्या प्रयत्नाने मुंबईने देखील कबड्डी हा दम स्विकारण्याचे ठरविले. १९६४-६५ साली मुंबई हुतुतु फेडरेशनचे “मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन” असे नामकरण करण्यात आले. हे सर्व कार्य अद्यापही मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली सुरु होते.
१९७५-७६ साली शासनाने एक अध्यादेश जारी केला. या आदेशाने प्रत्येक खेळाच्या संघटनेला आपापले वेगवेगळे अस्तित्व बहाल केले. म्हणजेच ‘वन गेम वन फेडरेशन’ या आदेशानुसार मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातून मुंबई कबड्डी संघटना वेगळी झाली. अशा तर्हेने या वेगळ्या झालेल्या मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष म्हणुन कै. श्री. रामभाऊ कांदळगांवकर यांनी कार्यभार स्विकारला. प्रमुख कार्यवाह म्हणुन आबासाहेब नाईक तर संयुक्त कार्यवाह म्हणुन राजेशिर्के व अनंत लोके यांची निवड करण्यात आली. त्यानंतर १९८२ साली शासनाच्या शासकीय कामकाजाच्या दृष्टीने मुंबई जिल्ह्याचे ‘मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर’ असे दोन विभाग करण्यात आले. त्यामुळे मुंबईतच ‘मुंबई शहर कबड्डी असोसिएशन’ व ‘मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन’ अशा दोन जिल्हा संघटना उदयास आल्या.
मुंबई जिल्हा संघटनेची १९८० साली पहिली पंचवार्षिक निवडणुक घेण्यात आली. त्या अगोदर हा कालावधी ३ वर्षाचा होता. या निवडणुकीनंतर अध्यक्ष म्हणुन कै. श्री. रामभाऊ कांदळगांवकर यांची बहुमतांनी निवड करण्यात आली. आबासाहेब नाईक यांची कार्याध्यक्ष म्हणुन तर चंद्रकांत दळवी यांची प्रमुख कार्यवाह म्हणुन निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने यशस्वी वाटचाल सुरु केली. या सर्वाचे फलित म्हणुन १९९१ साली मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली व मा.ना. छ्गनराव भुजबळ यांच्या सहकार्याने ९वी किशोर / किशोरी तसेच ___ वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धेचे देखणे व दिमाखदार आयोजन करण्यात आले. परंतु या आयोजनाची तयारी करीत असतानाच प्रमुख कार्यवाह चंद्रकांत दळवी यांचे अपघाती निधन झाले. स्पर्धा तर तोंडावर आलेली आणि संघटनेवर हा आघात कोसळला. हा आघात सहन करीत पुढची वाटचाल करीत असतानाच असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ कांदळगांवकर व खजिनदार दुलाजी राणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. परंतु या आघाताने डगमगुन न जाता आबासाहेब नाईक, राजाराम पवार, अनंत घाग, पांडुरंग परब, वसंत थळे इत्यादींनी संस्थेचा डोलारा समर्थपणे सांभाळला. त्यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी आबासाहेब नाईक यांनी स्विकारली.
१९९४च्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांनी आतापर्यंत या असोसिएशनचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला ते आबासाहेब नाईक हे वयोमानानुसार या जबाबदारीतुन मुक्त झाले. त्यांनी ती धुरा नव्या कार्यकर्त्यावर सोपविली. त्यानुसार यावेळी अध्यक्ष म्हणुन उदयदादा लाड, कार्याध्यक्ष म्हणुन राजाराम पवार, प्रमुख कार्यवाह म्हणुन मिनानाथ धानजी तर कोषाध्यक्ष म्हणुन दिगंबर शिरवाडकर यांची निवड करण्यात आली. सन १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिक निवडणुका नेहमीप्रमाणे जाहिर होऊन त्या बिनविरोध झाल्या. त्याचे सारे श्रेय संघटन कार्यालाच जाते. त्याची पोचपावती म्हणजेच या बिनविरोध निवडणुका.
असोसिएशनच्या घटनेप्रमाणे पाच वर्षानी निवडणुक जाहिर करण्यात येते. त्याकरिता २ निवडणुक अधिकारी नेमले जातात. त्यानुसार हि प्रक्रिया ४५ दिवसाची असते. प्रत्येक नोंदणीकृत संघाला आपला एक प्रतिनिधी मतदानाकरिता नोंदवावा लागतो. या प्रतिनिधींची मतदार यादी तयार होते. या यादीतील प्रतिनिधी निवडणुकीला उमेदवार म्हणुन उभे राहु शकतात. २५ सदस्य निवडून द्यावयाचे असल्यामुळे २५ जणांचे पॅनल तयार होऊ शकते व त्यांना चिन्ह म्हणुन एकच निशाणी मिळु शकते. जर २५ जणांचे पॅनल नसेल तर प्रत्येकाला वेगवेगळी निशाणी मिळते. एका संघ प्रतिनिधीला २५ सदस्य निवडून देण्याचा अधिकार आहे. जे २५ सदस्य निवडून येतील त्यांना १० पदाधिकारी निवडून देण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय ५ स्विकृत सदस्यांची ही नियुक्ती केली जाते. अशा प्रकारे ती कार्यकारिणी ५ वर्ष संघटनेचा कारभार पाहते.
इतर कोणत्याही जिल्ह्यात खेळाडु निधी व कबड्डी विकास निधी नसुन फक्त मुंबई शहर कबड्डी संघटनेकडे पाच लाखापेक्षा अधिक निधी जमविला असुन खेळाडु निधी हा खेळाडुंना स्पर्धेत दुखापत झाल्यास त्या निधीतुन तो खर्च दिला जातो. याशिवाय पंच, कार्यकर्ते यांना त्यांच्या नाजुक परिस्थितीत या निधीतुन मदत केली जाते. खेळाडु विकास निधी हा खेळाडूची शिबीरे, पंच मार्गदर्शन शिबीर, प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीरे, असोसिएशनचे इतर उपक्रम राबविण्याकरिता या निधीचा उपयोग केला जातो.प्रतिवर्षी निधी खर्च झालातरी तो वाढत कसा जाईल याची काळजी कार्यकारिणी घेत असते. यापूर्वी अनेक खेळाडू, पंच व कार्यकर्त्यांना या निधीचा फार मोठा आधार मिळाला आहे.
संघटनेला संलग्न असलेल्या जवळ-जवळ ५५० संघाची गटवारी करण्यात आली असुन त्यात स्थानिक संघात, प्रथमश्रेणी, द्वितीयश्रेणी, तृतीयश्रेणी, व्यावसायिक गटात विशेष गट, प्रथमश्रेणी, द्वितीयश्रेणी, महिला गटात स्थानिक व व्यावसायिक याशिवाय कुमार गट मुले/मुली, किशोर गट मुले/मुली अशाप्रकारे विभागणी केली आहे. प्रतिवर्षी या संघाची नोंदणी व छाननी होते. याशिवाय प्रतिवर्षी खेळाडूंची नोंदणी होऊन त्यांच्या ओळखपत्रावर तशी नोंद केली जाते.
संघटनेची जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा ही प्रतिवर्षी दिवाळीपूर्वीच घेतली जाते. त्यात कोणताही खंड पडत नाही. कारण जवळपास ४५० संघ या स्पर्धेत निरनिराळ्या १८ गटांत खेळत असतात. आठ क्रिडांगणावर रोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत १५ ते २० दिवस ही स्पर्धा चालते. या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पंच, १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते स्पर्धा यशस्वी करण्याकरिता झटत असतात. स्पर्धा सुरु होण्यापुर्वी तीन महिने अगोदर त्यांची नोंदणी प्रवेश अर्ज त्याशिवाय कुमार व किशोर गटातील खेळाडुंचे वजन व वयाचे दाखले याची छाननी केली जाते. छाननीत पात्र ठरलेल्या खेळाडुंची ओळखपत्रे जमा केली जातात व स्पर्धेच्या दिवशी त्यांची ओळख पटल्यावरच खेळण्यास परवानगी दिली जाते. जे संघ हरतील त्यांना ओळखपत्र परत केली जातात. हे करण्यामागे कारण एवढेच की कुमार/किशोर गटात १८० पेक्षा अधिक संघ खेळतात व सामने वेळेवर खेळविता यावेत. सर्व गटाकरिता फिरते चषक/ट्रॉफी आहेत. या स्पर्धेतुन मुंबई शहरचे प्रतिनीधिक संघ निवडले जातात. २००५ सालापासुन मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ हि स्पर्धा पुरस्कृत करीत आली आहे.
मुंबईमध्ये प्रतिवर्षी २ ते ३ अखिल भारतीय, ५ ते ७ राज्यस्तरीय व ७५ ते ८० जिल्हास्तरीय विविध गटांच्या स्पर्धा घेतल्या जातात.
मुंबईच्या पुरुष संघाने २१ वेळा राज्य अजिंक्यपद मिळवुन श्रीकृष्ण करंडकावर नाव कोरले असुन महिलांनी १२ वेळा विजेतेपद संपादन करुन पार्वतीबाई सांडव करंडक पटकाविला आहे. त्यात पुरुषांनी २ वेळा अजिंक्यपदाची हॅटट्रिक साधली आहे. मुंबईच्या पुरुष संघाने भारतीय पुरुष संघाला पराभूत करुन वीरों के वीर किताब मिळविला, तर महिला संघाने महाराष्ट्र शासनाची मानांकित शिवशाही चषकाची अखिल भारतीय महिला स्पर्धा पहिल्याच वर्षी जिंकुन शिवशाही चषक पटकाविला.