पहिली राष्ट्रीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा - २००९

- शशिकांत राऊत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पहिल्या व्यावसायिक स्पर्धेचे जेतेपद मुंबईच्या एअर इंडिया संघाने मिळविले. या पहिल्या व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेवर महाराष्ट्राच्या संघानीच आपला ठसा उमटविला. मुंबईच्या महिंद्रा अँण्ड महिंद्रा संघाने उपांत्य फेरीपर्यंत मारलेली धडक हि खरो़खरच कौतुकास पात्र होती. त्यांनी आपले लक्ष क्षेत्ररक्षण भक्कम राखण्यावर केंद्रित केले. उपउपांत्यपूर्व व उपउपांत्य सामन्यांत त्यांनी भक्कम क्षेत्ररक्षणाच्या बळावरच एच. ए. एल. व सी. आय. एस. एफ. या दोन बलाढ्य संघावर मात केली. भारत पेट्रोलियम या संघाने देखील जितेश जोशीच्या अनुपस्थितीत उपउपांत्य फेरीत ओ. एन. जी. सी. संघाला कडवी लढत दिली. मध्यंतराला त्यांच्याकडे ५ गुणांची आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे पुकारेपर्यंत आघाडी टिकविण्यांत ते यशस्वी ठरले, परंतु शेवटच्या पाच मिनिटात खेळाचे पारडे पालटले व त्यांना पराभव पत्करावा लागला. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक यांनी देखिल या स्पर्धेत छान कामगिरी केली. यावरुन असे दिसते कि महाराष्ट्रातील कबड्डी अजुन संपलेली नाही. त्याला योग्य दिशा व स्टॅमिन्याची जोड दिली तर अजुनही महाराष्ट्र अव्वल स्थान पटकावु शकतो. खेळ सुरु झाला की सुरुवातीची काही मिनिटे आपण विरुध्द संघापेक्षा सरस असतो परंतु नंतर मात्र आपली ताकद कमी – कमी होत जाते व आपणास पराभवास सामोरे जावे लागते.

गेली वर्षभर होणार-होणार म्हणुन गाजत असलेली व्यावसायिक स्पर्धा अखेर पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र हायस्कुलच्या पटांगणात पार पडली. भारतीय हौशी कबड्डी संघटना, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या स्पर्धेचे यजमानपद भूषविले. पुढील पाच स्पर्धा देखिल हि स्पर्धा महाराष्ट्रातच होईल असे सध्याच्या वातावरणामुळे दिसते. शेवटी भारतीय कबड्डी संघटनेला व कबड्डी या खेळाला महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही. ‘नाच करे बंदर, माल खाये मदारी’ या म्हणीप्रमाणे आपण फक्त स्पर्धा आयोजनात लाखो रुपये खर्च करावयाचे व इतरांनी काही न करता आपल्यावर हुकुमत गाजवायची. बुवा साळवी नंतर राष्ट्रीय स्तरावर आपली काय पत आहे. मोठ-मोठ्या रकमेची बक्षिसे आपण द्यावयाची, इतरांनी मात्र आपल्या जीवावर मजा मारायची. असो.

या स्पर्धेकरिता पालिकेने माझ्या अंदाजानुसार ५० लाखाचे अंदाज पत्रक तयार केले असणार. रोख रकमेची बक्षिसेच जवळपास ५.५ लाखाची वाटण्यात आली. शरद पवार यांच्या नावाने एक फिरता चषक देण्यांत आला. कायमस्वरुपी बक्षिसे वेगळी देण्यात आली. चार क्रीडांगणे चांगल्या पध्दतीने तयार करण्यात आली होती. क्रीडांगणाच्या चारी बाजुने कृत्रिम पध्दतीची हिरवळ (मॅट) वापरण्यात आली. व्यासपीठ देखील भव्य प्रमाणात बनविण्यात आले होते. क्रीडारसिकांना सामन्यांचा आस्वाद मनमुराद लुटता यावा म्हणुन भव्य गॅलरी (आसन व्यवस्था) उभारण्यांत आली होती. चारी क्रीडांगणावर विद्युत धावते गुणफलक लावण्यांत आले होते. त्यामुळे रसिकांना शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यांचे गुण त्वरीत कळत होते. एवढे सर्व भव्य दिव्य केले. अंदाज पत्रकही भव्य होते. परंतु एवढे सर्व करुन प्रसिध्दी माध्यमांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष्य झाले. आपण स्पर्धा घेण्याकरिता एवढा खर्च करतो परंतु जे करतो ते लोकांपर्यंत पोहोचले नाही तर त्याला काय अर्थ ? स्पर्धा आयोजकांनी याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

हि पहिलीच व्यावसायिक स्पर्धा म्हणुन याबाबत कुतुहल होतेच, कारण नोकर भरती बंद असल्यामुळे एकुणच प्रतिसाद कसा मिळेल या बाबत मध्यवर्ती संघटना देखील साशंक होती. साधारण २० संघाचा सहभाग अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात २४ संघानी यात सहभाग घेतला. सामने अपेक्षेपेक्षा रंगतदार झाले. कारण या स्पर्धेतुन देखील भारतीय कबड्डी संघाकरिता संभाव्य खेळाडु निवडण्यांत येणार आहेत. या २४ संघाची ६ गटांत विभागणी करण्यांत आली होती. या स्पर्धेत एअर इंडियाला अग्रमानांकन तर ओ. एन. जी. सी. (गुजरात) ला द्वितीय मानांकन देण्यात आले होते. संभाव्य विजेतेपदाच्या यादीत क्रीडारसिकांची प्रथम पसंती एअर इंडिया या संघालाच होती. त्यानंतर क्रमांक होते ते ओ. एन. जी. सी., स्पोर्टस ऑथरीटी ऑफ इंडिया, व बी. एस. एफ. परंतु महिंद्रा या संघाने अनपेक्षितपणे उपांत्य फेरीत धडक मारुन सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. ‘अ’ गटातुन एअर इंडिया, बी. एस. एफ., ‘ब’ गटातुन ओ. एन. जी. सी., एच. ए. एल., ‘क’ गटातुन सी. आय. एस. एफ, भारत पेट्रोलियम, ‘ड’ गटातुन स्पोर्टस ऑथरीटी ऑफ इंडिया, सी. आर. पी. एफ., ‘इ’ गटातुन विजया बँक, बी. एस. एन. एल., ‘फ’ गटातुन स्टेट बँक ऑफ म्हैसुर, महिंद्रा यांनी बाद फेरी गाठली. तर एअर इंडिया x सी. आर. पी. एफ., महिंद्रा x सी. आय. एस. एफ, ओ. एन. जी. सी. x भारत पेट्रोलियम, व बी. एस. एफ. x साई अशा उपांत्य लढती रंगल्या.

ओ. एन. जी. सी. x भारत पेट्रोलियम हा सामना अत्यंत रंगतदार झाला. त्यात शेवटच्या क्षणी ओ. एन. जी. सी. ने ३ गुणांनी बाजी मारली. बी. एस. एफ. x साई हा सामना तर ५-५ चढायांच्या अलहिदा डावा पर्यंत खेळला गेला. मध्यंतरातील पीछाडीवरुन बी. एस. एफ.ने पुर्ण डावात बरोबरी केली व ५-५ चढायांच्या जादा डावात साई वर ३ गुणांनी बाजी पलटविली. इतर दोन सामने मात्र एकतर्फी झाले. उपांत्य सामन्यांत एअर इंडियाने महिंद्रावर तर ओ. एन. जी. सी.ने बी. एस. एफ. वर मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत एअर इंडियाने अपेक्षेप्रमाणे सुरुवात तर झकास केली. परंतु ओ. एन. जी. सी.च्या जसबीर व मनप्रीतने त्यांचे सर्व मनसुबे उधळत १० मिनिटातच एअर इंडियावर लोण देत मध्यंतरापर्यंत ६ गुणांची आघाडी घेतली. यांनी खचुन न जाता मध्यंतरानंतर एअर इंडियाने जोरदार आक्रमण करीत शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना सामना बरोबरीत (१९-१९) आणला. शेवटी दिपक झझोटने ओ. एन. जी. सी.च्या जसबीरची मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट पकड केली. येथेच सामना एअर इंडियाकडे झुकला. या स्पर्धेत एअर इंडियाने सर्वच संघाना सहज पराभुत केले होते म्हणुन त्यांच्याकडुन फार अपेक्षा होत्या. या अपेक्षाचे दडपण देखील त्यांच्यावर आले. तसेच त्यांचे प्रशांत चव्हाण, दिपक झझोट, नरेंद्र्कुमार, दिनेशकुमार हे जायबंदी असुन देखील या स्पर्धेत खेळत होते. त्याच बरोबर सलग स्पर्धात्मक कबड्डी खेळल्यामुळे त्यांच्यावर ताण आला होता. म्हणुनच हा सामना त्यांना जड गेला.

या स्पर्धेला जोडुनच अखिल भारतीय स्तरावरील महिला कबड्डी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यांत आले होते. परंतु याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तामीळनाडु हा एकच संघ परराज्यातला होता. इतर ९ आपल्या जिल्ह्याचे संघ होते. यांची ३ गटांत विभागणी करण्यात आली होती. ‘अ’ गटातुन पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, ‘ब’ गटातुन मुंबई शहर, ठाणे जिल्हा, ‘क’ गटातुन मुंबई उपनगर, तामीळनाडु यांनी बाद फेरी गाठली. अपेक्षेप्रमाणे पुणे – मुंबई उपनगर अशी अंतिम लढत झाली. त्यात मुंबई उपनगरने १ गुणांनी बाजी मारली. मुंबई उपनगरचे प्रशिक्षक दशरथ शिंदे यांनी जास्तीत जास्त वेळ पुण्याची भरवशाची खेळाडु शितल मारणे हिला बाहेर ठेवण्याची खेळी खेळली, तीच त्यांच्या पथ्यावर पडली. तसेच शेवटच्या क्षणी तिची दोघा खेळांडुत झालेली पकड पुण्याला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडु –

पुरुष – जसवीर सिंग (ओ. एन. जी. सी), महिला – शीतल मारणे (पुणे )

स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई –

पुरुष – अनुपकुमार ( एअर इंडिया), महिला – अश्विनी महाडीक ( मुंबई उपनगर)

स्पर्धेतील उत्कृष्ट पकड –

पुरुष – जगदीप सिंग ( ओ. एन. जी. सी), महिला – प्रमोदिनी चव्हाण ( मुंबई उपनगर)