'वाटचाल मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची'
 

५०वी राज्य अजिंक्यपद सुवर्ण महोत्सवी स्पर्धा भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे भव्यदिव्य प्रमाणात भरविण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आले ते म्हणजे शिवाजी पार्क ते सिध्दीविनायक व वडाळा येथे क्रीडा ज्योत व चषकांची भव्य मिरवणुक काढली. यात दोन हजारपेक्षा अधिक खेळाडु, कार्यकर्ते, पंच, पुढारी सामिल झाले होते. स्पर्धेकरीता उत्तम प्रकारची सहा क्रिडांगणे, प्रेक्षकांना बसण्यास स्टेडियम, बिसलरी पाणी व्यवस्था, उत्तम निवासस्थाने, उत्तम जेवण, खेळाडु, कार्यकर्ते, पंच यांना ओळखपत्रे, उत्तम प्रकाश योजना, अत्यंत देखणी सजावट, खेळाडुंना बसण्यासाठी बा़कडे, प्रथमोपचाराकरिता डॉक्टर व हाडवैद्यांची पथके, धावते गुणफलक, स्पर्धेच्या कालावधीत सतत पेटत राहणारी क्रिडा ज्योत, उत्कृष्ट संचालन, भव्य ट्रॉफ्या, टी- शर्ट कॅप, पाहुण्यांचा व मान्यवर खेळाडुंचा सत्कार आदी व्यवस्था करण्यात आली. याशिवाय प्रथमच राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकातील पुरुष/महिला संघांना व खेळाडुंना रोख व वस्तुरुपी पारितोषिके प्रदान करण्यात आली

संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिवर्षी जुलै महिन्याच्या १० नंतर येणार्‍या रविवारी घेतली जाते. त्यापुर्वी सर्व संलग्न संस्थाना वार्षिक अहवाल व जमाखर्च दिला जातो. कबड्डी क्षेत्रात अशा प्रकारे वेळेवर अहवाल, जमाखर्च सादर करुन वार्षिक सभा वेळेवर घेणारी अशी एकमेव संघटना असावी.

प्रतिवर्षी कार्यकारिणीची पावसाळी दोन दिवसाचे शिबीर निसर्गरम्य ठिकाणी घेऊन असोसिएशनच्या वर्षाचा कार्यक्रम ठरविण्यात येतो. याकरिता निरनिराळे विषय कार्यक्रम पत्रिकेवर ठेवून त्यावर साधक-बाधक चर्चा करुनच सर्व कार्यकारिणी एक मताने निर्णय घेत असतात. त्यामधे चाचणी स्पर्धा, पंचवर्ग व पंचपरीक्षा, पंच शिबीर, खेळाडु व विकास निधी, गटवारी, विविध स्पर्धा कार्यक्रम, खेळाडु शिबीरे, असोसिएशनच्या पुढील कार्याची वाटचाल इत्यादी विषय हाताळले जातात. विभागवार काम सुलभ होण्याकरीता पंच सामिती, खेळाडु निवड समित्या, तक्रार निवारण समिती, गटवारी समिती, छाननी समिती, खेळाडु निधी समिती, कबड्डी विकास निधी समिती, क्रिडांगण समिती, खेळाडु गुणगौरव समिती नियुक्त केल्या जातात.

कार्यालयात प्रमुख कार्यवाह, दोन संयुक्त कार्यवाह, खजिनदार, १० ते १५ कार्यकारिणी सदस्य, पंच समिती, सेक्रेटरी, पंच सदस्य, व इतर कार्यकर्ते नेहमीच उपस्थित असतात. त्यामुळे कचेरीचे कार्य सहजतेने रोजच्या रोज पार पाडले जाते. या सर्वांची पोच पावती म्हणजे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा "सर्वोत्कृष्ट आदर्श कार्यरत जिल्हा" म्हणुन प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

गेल्या फार वर्षांपासुन संघाना रोख रुपयांची पारितोषिके दिली जात आहे याकरिता मुंबई शहरच्या पुरुष किंवा महिला संघाने रोख रकमेची पारितोषिके मिळवल्यास त्यातील ५० टक्के रक्कम खेळाडुंना देण्याचा ठोस निर्णय घेतल्यामुळे खेळाडुंना आर्थिक फायदा झाला आहे.

कबड्डी क्षेत्रात कार्याचा लेख सतत वाढवत ठेवणे हा उद्देश नसुन कार्याची जोपासना कायम राहण्यासाठी कार्य करीत असताना प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीरे, पंचासाठी पंच शिबीरे, पावसाळी शिबीरे, जिल्हा, अखिल भारतीय पंच परीक्षा, उजळणी वर्ग, जिल्हा, राज्य, अखिल भारतीय स्पर्धांचे आयोजन, कबड्डी विचार मंथन, कबड्डी विकास निधी, खेळाडु  - कार्यकर्ते पंच यांच्याकरिता खेळाडु कल्याण निधी यासारखे उपक्रम पार पाडले आहेत याशिवाय शालेय स्पर्धा, विद्यापीठ, आंतर कॉले़ज, संलग्न संस्थाच्या कबड्डी स्पर्धा, बँक बोर्ड, पोस्ट अँण्ड टेलीग्राफ, रेल्वे, बंदरे, कस्टम्स, आयकर, ऑईल कंपन्या, पोलिस, एन. टी. सी., आर. एम. एम.एस. ग्रामस्थ मंडळे, विविध समाजाच्या स्पर्धा यामध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केल्या आहेत.

मुंबई शहर कबड्डी संघटना निव्वळ निवडणुका, निवड चाचणी स्पर्धा व इतर तेच तेच उपक्रम राबविण्यात धन्यता न मानता, कबड्डी खेळ हा इतर खेळांप्रमाणे जनसामान्यापर्यंत कसा पोहचविता येईल याचा सतत विचार करीत असते. त्याकरिता आधुनिकतेची कास पकडणे हे गरजेचेच आहे. प्रथम कबड्डी या खेळाच्या स्पर्धा व संघटना करीत असलेल्या सर्वकार्याची माहिती प्रसार माध्यमाद्वारे कबड्डी-प्रेमीं पर्यंत पोहचवावी म्हणुन 'फॅक्स' मशिन देणगीदाखल उपलब्ध केली. त्याकरीता वेगळी समिती स्थापन केली. कबड्डीत उपलब्ध असलेली माहिती पुढील पिढीला ज्ञात व्हावी म्हणुन कार्यालयाकरिता नवीन 'संगणक' (कॉम्प्युटर) घेण्यात आला. खेळाडु व कार्यकर्त्यांची काळजी घेताना त्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन 'एक्वागार्ड्'चे शुध्द पाण्याचे यंत्र देणगीदाखल मिळवण्यांत आले.

आपले कार्यालय नीट-नेटके असावे, आलेला प्रत्येक पाहुणा मग तो राजकीय क्षेत्रातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातला असो त्यांनी कार्यालयात पाऊल ठेवताच समाधान वाटावयास हवे त्यांचे मन प्रसन्न होऊन त्यांना कबड्डी या खेळाबद्दल आदर वाटावयास हवा याकरिता कार्यालयाचे नुतनीकरण आवश्यक होते. या कामासाठी लागणार्‍या खर्चाची रितसर मान्यता कार्यकारिणीच्या सभेत पास करुन घेण्यात आली. कबड्डी-प्रेमी लक्ष्मण कदम यांनी 'वातानुकुलीत यंत्र' (एअर कंण्डीशन) देणगीदाखल दिले. कार्यालयात अर्ध्या भिंतीपर्यंत टाईल्स लावण्यात आल्या. मुंबई शहरच्या संघानी मिळविलेल्या व यापुढे मिळणारी बक्षिसे ठेवण्याकरिता नव्याने 'शो-केस' तयार करण्यात आली. टाईल्स वगळता उरलेल्या भागाला रंगरंगोटी करण्यात आली. कार्यालयाच्याच बाजुला एक छोटे सभागृह करण्यात आले. कार्यालयात नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने अंतर्गत सजावट करण्यात आली जेणेकरुन कार्यालयात येणार्‍या प्रत्येक कबड्डी प्रेमीला कार्यालयात प्रवेश करताच प्रसन्न वाटावयास हवे.

सामन्याचा आनंद घेताना क्रीडा रसिकांना दोन्ही संघाच्या गुणांची माहिती व्हावी, खेळाडूंना देखील सामना खेळताना आपले किती गुण आहेत, यापुढे कशा प्रकारे खेळाची व्युहरचना करावयास हवी याची कल्पना यावी म्हणुन ६ 'विद्युत गुणफलक' देणगी दाखल मिळवण्यास संघटना यशस्वी झाली. भायखळ्याचे आमदार मा. श्री. अरुण गवळी यांनी ते उपलब्ध करुन दिले. मुंबई, महाराष्ट्रात कोठेही सामने असोत स्पर्धा भरविणार्‍या संस्थेने याची मागणी केल्यास त्यांना ते विनामुल्य उपलब्ध करुन दिले जातात. खेळात, खेळाडूत व कार्यकर्त्यात चुरस वाढीस लागावी म्हणुन "मुंबई कबड्डी गुणगौरव दिनाच्या" माध्यमातुन वर्षभरात उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडु, संघ तसेच राज्य व राष्ट्रीय संघात निवड झालेले खेळाडु, राज्यनिवड चाचणी स्पर्धेत अजिंक्य ठरणार्‍या संघाचा 'गुणगौरव' करण्यात येतो.

इतर खेळाच्या बरोबरीने आपणास वाटचाल करावयाची असेल तर संघटनेच्या विचारात आमुलाग्र बदल करावे लागतील याची जाण मुंबई शहरच्या कार्यकारिणीला आहे म्हणुनच तर संपुर्ण कबड्डी जगतात मुंबई शहरला आदर्श जिल्हा म्हणुन मान आहे. आपणा सर्वांच्या मार्गदर्शन व आर्शिवादाने संघटना प्रगतीचे एक-एक दालन पादाक्रांत करीत आहे. आपल्या शुभेच्छा व पाठबळ संघटनेच्या पाठीशी असेच भक्कमपणे राहो जेणेकरुन भविष्यात नव-नवीन संकल्पना व उपक्रम राबविण्याकरिता संघटनेला उर्जेचा स्त्रोत प्राप्त होईल.